सामाजिक | चिंबळी येथे काळभैरवनाथ उत्सव उत्साहात; बैलगाडा शर्यती, कुस्ती स्पर्धा रंगल्या
चिंबळी : खेड तालुक्यातील चिंबळी येथे श्री काळभैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबवून मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, मंडप उभारून उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मंगळवार (दि. ७) रोजी पहाटे मंदिरात श्रींची महापूजा व अभिषेक पार पडला. त्यानंतर सकाळी मानाच्या मांडव-डहाळ्यांची भव्य मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आली. पुढे सकाळी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतींसाठी तब्बल ९ लाख ९९ हजार ९९९ रुपयांचे बक्षीस व चषक ठेवण्यात आले होते. घाटात पार पडलेल्या बक्षीस वितरण सोहळ्यास मोठी गर्दी झाली.
सायंकाळी श्री भैरवनाथ महाराजांची पालखी मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. रात्री करमणुकीसाठी तुकाराम खेडकर यांच्या लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम तसेच सभामंडपात संगीत भजन स्पर्धा पार पडली.
बुधवार (दि. ८) रोजी सकाळी लोकनाट्य तमाशाचा हजरी कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी भव्य निकाली कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत शंभर रुपयांपासून ते १ लाख ५१ हजार रुपयांपर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या उत्सवाचे आयोजन समस्त ग्रामस्थ व श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले असून, परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.
प्रतिनिधी - सुनील बटवाल