सहा वर्षांच्या चिमुकलीसह आजीची निघृण हत्या; दुहेरी हत्याकांडाने आळंदी हादरले
क्राईम | आळंदी (तालुका खेड) परिसरातून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. केळगाव येथील हनुमानवाडीच्या आदिवासी ठाकरवस्तीत एका ६ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीसह तिच्या ६० वर्षीय आजीची अज्ञात नराधमांनी गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
* घटनेचा सविस्तर आढावा :
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात आरोपींनी घरात घुसून धारदार शस्त्राने आजी आणि नातीवर हल्ला केला. दोघांचाही गळा चिरून खून करण्यात आला. घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
* खुनामागील कारण अद्याप अस्पष्ट :
भरवस्तीत दिवसाढवळ्या घडलेल्या या दुहेरी हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चोरीच्या उद्देशाने हा प्रकार घडला की कौटुंबिक वादातून, याचा तपास पोलीस करत आहेत.
* परिचित व्यक्तीवर संशय :
प्राथमिक अंदाजानुसार, हा गुन्हा परिचित व्यक्तीकडूनच झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
* तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली :
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून संशयित व्यक्तींची चौकशी केली जात आहे. आरोपींना लवकरच अटक करण्याचा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
* सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर :
दिवसाढवळ्या भरवस्तीत घडलेल्या या भीषण घटनेमुळे आळंदी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.