समानता सांगण्यासाठी नव्हे तर ती जगण्यासाठी; स्री पुरुष समानता आणि आपण

पुणे : समानता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती स्त्री पुरुष समानता,मग त्याला लिंगभाव समानता असेही म्हटले जाते,पण समानता म्हटलं की केवळ लैंगिकता किंवा लैंगिक समानता नाही तर समानतेचे अनेक पैलू आहेत,त्यासाठी नेमक लैंगिक एकात्मता म्हणजे काय या अगोदर लिंगभाव समजून घेणे गरजेचे आहे,लिंगभाव म्हटलं तर त्याचेही आता नवे पैलू समोर येत आहेत आणि ते स्वीकारले सुद्धा जात आहेत हे महत्त्वाचे, तरीही खरच आपण सर्वसमभाव आणि लैंगिक समानता मानतो का? हे अजूनही खूप विचारपूर्वक विचार आणि अमल करण्याची गरज आहे,ते जगण्यात उतरले पाहिजे.
या लेखात फक्त स्त्री पुरुष त्यातही पती पत्नी या नात्यातील समानतेवर टिपणी करत आहे.स्त्री नोकरी करू शकते,अमुक करू शकते वैगरे बोलण्यासाठी ठीक आहे पण खरंच आजही स्त्री स्वतंत्र आहे का ? ती समानतेने जगतेय का? तिला समानतेची वागणूक मिळतेय का? आणि आपण तसे जगतोय का ? हे तपासावे लागेल.
खास करून नात्याबद्दल बोललं तर फक्त सोबत फिरणे,स्त्री ला तिचे काम करता येणे इतकीच समानतेची व्याख्या अर्थहीन आहे.स्त्रीला निर्णयात सहभाग,स्वातंत्र्य आणि सन्मान असायला हवा ज्यामुळे तिचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढेल जो स्त्रीच्या आरोग्यासाठी सुद्धा उपयोगी आहे.स्त्रीला माणूस आणि व्यक्ती म्हणून तिचे अस्तित्व आहे ते स्वीकारायला हवे,तिला आवश्यक तिथे सोबत,सहयोग देणे आणि विश्वास देणे हे प्रत्येक जोडीदाराचे,पुरुषांचे कर्तव्य आहे.
जोडीदाराने घरातील कामापासून ते तिच्या क्रियाशीलतेमध्ये जबाबदारीने वाटा उचलला पाहिजे,घरातील कामे फक्त स्रियांची हे न समझता प्रत्येक काम हे पुरुषांनीही तितक्याच आत्मीयतेने केली तर त्या स्त्रीला खूप सुखी वाटते आणि विश्वासही निर्माण होतो.नुसते पुरुषसत्ता,महिलांना न्याय,समानता..वैगरे बोलण्यापेक्षा किमान घरातील स्त्रीलाही समानतेची वागणूक मिळायला लागली तरी आपण समानतेच्या मार्गावर आहोत हा अनुभव आणि उदाहरण जगासमोर उभा राहील हा प्रयत्न आवश्यक आहे.
केवळ हे इतके पुरेषे नसले तरी किमान घरातून समानतेची सुरुवात होऊ शकते जी फक्त बोलण्यासाठी नव्हे तर ती जगण्यात आली की खऱ्या अर्थाने समानता म्हणता येईल.
स्त्री पुरुष समानतेपुरते जरी विचार करायचे म्हटले तर अगदी घरातून आणि स्वतः पासून समानतेचा प्रवास सुरु करायला हवा जो एकूण समतेचा मार्ग असेल.
- लेखक - युवराज गटकळ,पुणे. ( 9326349415 )