सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी मोठ्या अपघाताची वाट पाहतोय का?नागरिकांचा आरोप

पाईटच्या लोढुंगवाडी पुलाचे रखडलेले काम;काँक्रीट वाहतूक करणारी गाडी थेट पलटी

 0
सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी मोठ्या अपघाताची वाट पाहतोय का?नागरिकांचा आरोप

सामाजिक | प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १६ वरील पाईट तालुका खेड गाव हद्दीतील लोढुंगवाडी ओढ्यावर सुरू असलेल्या साकव पुलाच्या कामातील हलगर्जीपणा आता थेट नागरिकांच्या जीवावर उठला आहे. तब्बल एक ते दीड वर्षांपासून रखडलेल्या या कामामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मागील अनेक महिने बंद पडलेले काम आता पुन्हा सुरू झाले असले तरी तेही अत्यंत संथ गतीने सुरू आहे. दरम्यान, पुलासाठी करण्यात आलेला भराव खचल्याने काँक्रीट घेऊन आलेली गाडी थेट पलटी झाली. चालक जखमी झाला असून सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र हा इशारा समजूनही प्रशासन अजूनही झोपेतच असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

भराव खचल्यामुळे रस्ता अत्यंत अरुंद झाला असून दररोज हजारो वाहनचालक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. मोठा अपघात झाल्यानंतरच अधिकारी जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

स्थानिकांच्या मते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पूर्णपणे ढेपाळले असून कामाकडे गंभीरपणे पाहिले जात नाही. विशेष म्हणजे, नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले की काही लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांची बाजू घेत असल्याने संताप आणखी वाढत आहे.

“जे सर्वसामान्य नागरिकांना स्पष्ट दिसत आहे, ते प्रशासनाला का दिसत नाही? की एखाद्या मोठ्या दुर्घटनेचीच वाट पाहिली जात आहे?” असा रोष ग्रामस्थांनी व्यक्त केला. तातडीने पुलाचे काम पूर्ण करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.