आळंदीत अयोध्या श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिन उत्साहात साजरा
सह्याद्री | अयोध्येतील श्रीराम मंदिरातील श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या वर्धापन दिनानिमित्त आळंदी येथे उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आवेकर - भावे श्रीरामचंद्र संस्थान,आळंदी यांच्या वतीने इंद्रायणी नदीकाठावरील श्रीराम मंदिरात पारंपरिक धार्मिक विधी, हरिपाठ व हरिनाम गजरात हा सोहळा पार पडला.
अयोध्येत वेदमंत्रांच्या जयघोषात श्रीरामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिर लोकार्पण सोहळा झाला होता.त्या ऐतिहासिक घटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आळंदीत हरिपाठ,आरती व धार्मिक प्रथांचे पालन करीत भक्तिमय वातावरणात कार्यक्रम घेण्यात आला.
या वेळी श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप मोहन महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील साधकांनी हरिपाठ सेवा सादर केली.कार्यक्रमाचे संयोजन संस्थानचे विश्वस्त अर्जुन मेदनकर यांनी केले. हरिपाठ सेवेचे नियोजन ह.भ.प. रामचंद्र महाराज सारंग व हभप रवींद्र भूमकर यांनी केले.श्रीराम मंदिराचे पुजारी महेश अयाचित,माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मानकरी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे,गोविंद ठाकूर तौर,आळंदी धाम सेवा संस्थेचे रोहिदास कदम,लक्ष्मण मेदनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित भाविकांना रामरक्षास्तोत्र ग्रंथाचे वाटप करण्यात आले तसेच लाडू प्रसाद देण्यात आला.महाराष्ट्र ही संतांची व वारकरी संप्रदायाची भूमी असून, अशा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भक्तीभाव अधिक दृढ होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.संस्थानचे अध्यक्ष राहुल आवेकर व सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम मंदिरात हा वर्धापन दिन मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला.