खेड तालुक्यातील कडूसमध्ये गोहत्येच्या निषेधार्थ आज गाव बंद
सकाळी १० वाजता निषेध मोर्चा
सह्याद्रि लाईव्ह | ‘प्रति पंढरपूर’ अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र कडूस (ता.खेड) येथे गोहत्येच्या घटनेच्या निषेधार्थ आज दि १ सप्टेंबर रोजी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बजरंग दल कडूस शाखेच्या गोरक्षा विभागाच्या माध्यमातून हा बंद पुकारण्यात आला आहे.
कडूस येथील तुरुकवाडी परिसरात ३१ ऑगस्ट रोजी दोन गोमातांची कत्तल झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिंदू धर्मातील पवित्र श्रावणी सोमवार आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी ही घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी १० वाजता निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. भैरवनाथ महाराज मंदिरापासून सुरू होणारा मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत नेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
दरम्यान, यापूर्वीही पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशी कडूस परिसरात गोहत्या झाल्याचा आरोप करण्यात आला होता. हिंदूंच्या पवित्र सण आणि धार्मिक दिवसांच्या पार्श्वभूमीवर अशा घटना घडत असल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आल्याचे बजरंग दलाच्या गोरक्षा विभागाकडून सांगण्यात आले.
घटनेच्या पार्श्वभूमीवर गावात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये,यासाठी खेड पोलिसांकडून कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे.