साखळी उपोषणात वारकऱ्यांचा सहभाग;पायाभूत सुविधांच्या विरोधात गणेश बोत्रे आक्रमक
चाकण : चाकण एमआयडीसी आणि परिसरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडी,कचरा,सांडपाणी आदी प्रश्नाविरोधात जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्या पुढाकाराने उद्यापासून (दि.18/19) दोन दिवसांचे साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनाला समाजातील विविध घटकांकडून मोठा पाठिंबा मिळत असून संत तुकाराम महाराजांच्या भूमीतून वारकरी संप्रदायही आंदोलनात सहभागी होणार आहे.
चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी,कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया त्याचा उद्योगांवर होणारा परिणाम आणि त्यामुळे चाकणची होत असलेली औद्योगिक बदनामी यामुळे उद्योजक, कामगार तसेच स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रश्नाची दखल घेत गणेश बोत्रे यांनी साखळी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
* टाळ-मृदुंगाच्या गजरात आंदोलनाला पाठिंबा -
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी दोन दिवस उपोषणस्थळी उपस्थित राहणार असून टाळ-मृदुंगाच्या गजरात भजन-कीर्तनाच्या माध्यमातून वाहतूक कोंडीविरोधातील आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या परिसरातून सामाजिक प्रश्नासाठी वारकरी एकवटणार असल्याने आंदोलनाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पुरुष वारकऱ्यांसोबतच महिला वारकरीही मोठ्या संख्येने सहभागी होणार असून भजनाच्या माध्यमातून आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करणार आहेत. त्यामुळे दोन दिवस चाकणच्या आंदोलनस्थळी टाळ-मृदुंगाचा नाद घुमणार आहे.
* ग्रामपंचायतींचे ठराव; विविध घटक आंदोलनाच्या मैदानात -
जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील विविध ग्रामपंचायतींनी ठराव करून आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याची भूमिका जाहीर केली आहे.याशिवाय चाकण एमआयडीसीतील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, मनुष्यबळ विकास अधिकारी, विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, खासगी वाहतूकदार, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी तसेच महिला बचत गटांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
वाहतूक कोंडीचा फटका केवळ स्थानिक नागरिकांना बसत नसून उद्योग, कामगार, वाहतूकदार आणि विद्यार्थ्यांनाही त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील घटक या आंदोलनाच्या माध्यमातून एकत्र येत असल्याचे चित्र आहे.
* संत तुकाराम महाराजांच्या भूमीतून आंदोलनाला बळ -
चाकण एमआयडीसीचा परिसर हा देहूच्या पंचक्रोशीशी जोडलेला असल्याने संत तुकाराम महाराजांच्या तपोभूमीतील विविध धार्मिक आणि सामाजिक संस्थांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
तीर्थक्षेत्र देहू देवस्थान, भामचंद्र डोंगर सप्ताह समिती, भंडारा डोंगर देवस्थान आदी संस्थांकडून आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न आता केवळ चाकणपुरता मर्यादित न राहता परिसरातील विविध घटकांचा प्रश्न बनला आहे.
* ‘वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा’ -
चाकण एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग असून हजारो कामगार दररोज या परिसरात ये-जा करतात. अवजड वाहनांची वाढती संख्या, अपुरे रस्ते आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे कोंडी नित्याचीच झाली आहे.
* या वाहतूक कोंडीचा परिणाम उद्योगांच्या - उत्पादनावर, मालवाहतुकीवर, कामगारांच्या वेळेवर आणि स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. परिणामी चाकणची औद्योगिक ओळखही धोक्यात येत असल्याची भावना उद्योजक आणि नागरिकांमध्ये आहे.
त्यामुळे केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता चाकण एमआयडीसी आणि परिसरातील वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी प्रमुख मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे.
दोन दिवसांच्या साखळी उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, टाळ-मृदुंगाचा नाद, भजनाचा गजर आणि विविध समाजघटकांचा सहभाग यामुळे हे आंदोलन चाकणच्या वाहतूक प्रश्नाला व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप देण्या
ची शक्यता आहे.