पाईट–आंबेठाण जिल्हा परिषद गटात महिलांसाठी महाकालेश्वर उज्जैन दर्शन यात्रा
सह्याद्री DIGITAL NEWS | खेड तालुक्यातील पाईट–आंबेठाण जिल्हा परिषद गटातील महिला भगिनींसाठी राजश्रीताई संजय जैद यांच्या माध्यमातून पवित्र महाकालेश्वर उज्जैन दर्शन यात्रा (तिसरा टप्पा) आयोजित करण्यात आली असून,ही यात्रा दि. १ जानेवारी २०२६ ते दि. ३ जानेवारी २०२६ या कालावधीत भक्तिभावात संपन्न होणार आहे. या यात्रेत तिसऱ्या टप्प्यात समाविष्ट गावांतील भाविक महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार आहे.
या टप्प्यात हेद्रूज, रौंधवाडी, चोरखेवाडी, तळवडे, गडद, कोळिये, वाहगाव, शेलू, रोहकल, कोये, चांदूस, ठाकूर-पिंपरी, कोरेगाव, शिवे, देशमुखवाडी, किवळे, देवतोरणे व कोरेगाव खुर्द या गावांतील महिलांसाठी ही विशेष धार्मिक यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील महिलांना एकत्र येत अध्यात्मिक अनुभूती मिळावी, तसेच सांस्कृतिक परंपरांचे जतन व्हावे, या हेतूने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
उज्जैन येथील द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भगवान महाकालेश्वराच्या दर्शनामुळे महिलांना अध्यात्मिक समाधान, मानसिक शांती व सकारात्मक ऊर्जा मिळेल, असा आयोजकांचा विश्वास आहे. यात्रेदरम्यान भाविक महिलांच्या सुरक्षितता व सोयीसाठी प्रवास, निवास, भोजन, दर्शन व्यवस्था तसेच आरोग्यविषयक आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
या पवित्र यात्रेचे आयोजन राजश्रीताई संजय जैद (शांताई मेमोरियल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, शांताई प्रतिष्ठान, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. या उपक्रमाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत असून, सर्व नियोजन सुयोग्य पद्धतीने राबविण्यात येत आहे.
या यात्रेमुळे महिला भगिनींमध्ये एकात्मता, श्रद्धा, सामाजिक सलोखा व परस्पर स्नेह वृद्धिंगत होईल, तसेच ग्रामीण महिलांना धार्मिक व सांस्कृतिक अनुभवाची अनोखी संधी मिळेल,असा विश्वास राजश्रीताई संजय जैद यांनी व्यक्त केला आहे.