करंजविहिरे–वाकी रस्त्यावरून ग्रामस्थांचा संतापाचा उद्रेक...
महापालिकेवर धडक; "आता रस्ता द्या, नाहीतर तीव्र आंदोलन अटळ!"
चाकण : करंजविहिरे ते वाकी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे संतप्त झालेल्या वाकी (ता.खेड) ग्रामस्थांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर धडक देत प्रशासनाला थेट जाब विचारला.अनेक महिन्यांपासून पाईपलाईनच्या कामाच्या नावाखाली नागरिकांची अक्षरशः फरफट सुरू असून, रस्त्याची चाळण झाल्याने विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिक रोज जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. मात्र प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा तीव्र संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.
याप्रसंगी विश्वास शिवेकर,माजी चेअरमन साहेबराव कोळेकर,माजी सरपंच अक्षय शिवेकर, संपत शिवेकर,गेणभाऊ पाचारणे,मारुती पोमण, आशिष शिवेकर,महादू कोळेकर,शिवाजी शिवेकर, समीर कोळेकर,सत्यवान खेंगले,अमोल कोळेकर, ज्ञानेश्वर शिवेकर,गोपी तुळवे,गणेश खेंगले आदी उपस्थित होते.
महापौर रवीभाऊ लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेत विश्वास शिवेकर यांनी प्रशासनाच्या निष्क्रिय आणि बेफिकीर कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. "पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या धरणग्रस्त गावांना जर साधा सुरक्षित रस्ताही देता येत नसेल, तर हा विकास नेमका कोणासाठी?" असा थेट आणि बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, आता केवळ आश्वासनांची खैरात चालणार नाही. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तातडीने ठोस निर्णय घेऊन काम सुरू न केल्यास यापेक्षा अधिक तीव्र जनआंदोलन उभारले जाईल. प्रशासनाने वेळेत जागे न झाल्यास गावकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला.
यावेळी महापौर आणि आयुक्त यांनी ग्रामस्थांच्या भावना समजून घेत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र वाकी ग्रामस्थांनी "आता आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवे," अशी ठाम भूमिका घेत प्रशासनाला अंतिम इशारा दिला.
"आमच्या जमिनी घेतल्या... आमचे पाणी घेतले... पण आमच्या गावाला विकासापासून कायम वंचित ठेवले. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही. करंजविहिरे–वाकी रस्ता झालाच पाहिजे; अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष छेडला जाईल," असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.