विषबाधेने मेंढ्यांचा मृत्यू;दूषित पाण्याचा संशय,जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांची तातडीने दखल
चाकण : खालुंब्रे (ता. खेड) येथील MIDC हद्दीत विषबाधेमुळे तीन गाभण मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सततचा पाऊस, थंडी आणि परिसरातील कंपन्यांमधून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्यामुळे ही विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या घटनेमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेत अहमदनगर जिल्ह्यातील ढवळपुरी येथील धनगर समाजातील पशुपालक केरबा मारुती शिंगटे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शिंगटे हे मेंढपाळ व्यवसायासाठी आपल्या कळपासह खालुंब्रे परिसरात वास्तव्यास आहेत. परिसरात साचलेले किंवा वाहणारे दूषित पाणी प्यायल्याने तीन गाभण मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गाभण मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने केवळ तीन जनावरांचेच नव्हे, तर भविष्यात जन्माला येणाऱ्या कोकरांचेदेखील नुकसान झाल्याने त्यांना दुहेरी आर्थिक फटका बसला आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य गणेश कांताराम बोत्रे यांनी तातडीने दखल घेत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून त्वरित पंचनामा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यांच्या पाठपुराव्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि मृत मेंढ्यांची पाहणी करून पंचनामा केला.
यावेळी तलाठी गणेश पोतदार, विशाल तुळवे आणि शिवाजी बोत्रे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक नोंदी घेतल्या असून, मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी पुढील तपास आणि आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, MIDC परिसरातील कंपन्यांमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरातील जनावरे आणि पर्यावरण धोक्यात येत असल्याची तक्रार स्थानिकांकडून वारंवार केली जात आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेची सखोल चौकशी करून दूषित पाण्याचे नमुने तपासावेत, जबाबदारांवर कठोर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त पशुपालकाला तातडीने आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी पशुपालक आणि ग्रामस्थांनी केली आहे.
या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पशुधनाच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.