खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील अतिवृष्टीग्रस्त गावांची समीर सुपे यांच्याकडून पाहणी
शेतकऱ्यांना तातडीने मदत व भरपाई देण्याची मागणी
सामाजिक | खेड तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. डोंगराळ भौगोलिक परिस्थितीमुळे या भागात पावसाचे प्रमाण अधिक असून अनेक गावांमध्ये शेती, घरे, रस्ते तसेच मूलभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.
या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वाडा-वाशेरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे यांनी चिखलगाव, औदर, वाशेरे, भोरगिरी तसेच परिसरातील इतर गावांना प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बांध वाहून गेले असून बटाटा बियाणे, घरामध्ये साठवून ठेवलेले धान्य, जनावरांसाठीचा चारा तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पाझर तलाव, रस्ते, पूल, वीजपुरवठा आणि मोबाईल नेटवर्क सेवा देखील पूर्णपणे विस्कळीत झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्रशासनाला तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना शासनाची आर्थिक मदत आणि भरपाई त्वरित उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
तसेच अनेक ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याची तीव्र समस्या निर्माण झाल्याने कात्रज दूध संघाचे चेअरमन अरुण चांभारे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून चारा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली आहे.
यावेळी समीर सुपे यांनी प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच कोणताही बाधित शेतकरी किंवा कुटुंब शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशी मागणी केली.