लोकनाट्य तमाशाला मिळालेला मान; ‘माझ्या सात पिढ्यांचा उद्धार झाला’ – रघुवीर खेडकर
सह्याद्री LIVE | अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. लोकनाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ तमाशा कलाकार, महाराष्ट्राचे ‘सोंगाड्या’ म्हणून ओळखले जाणारे रघुवीर खेडकर यांना २०२६ सालचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. या सन्मानानंतर “माझ्या सात पिढ्यांचा उद्धार झाला आहे,” अशा शब्दांत खेडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये तमाशा या लोककलेसाठी पहिल्यांदाच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने कलाविश्वात आनंदाचे वातावरण आहे.
तमाशा सम्राट रघुवीर खेडकर म्हणाले, “मला मनस्वी आनंद झाला आहे. आतापर्यंत लावणीला हा मान मिळाला होता, पण आज तमाशा सृष्टीला हा सन्मान मिळाला आहे. हा पुरस्कार माझा नसून संपूर्ण तमाशा परंपरेचा आहे.”
आपल्या प्रवासाविषयी बोलताना ते म्हणाले, “१९७० साली मी बालकलाकार म्हणून रंगमंचावर उभा राहिलो आणि आजही कार्यरत आहे. आमच्या तमाशा फडात सुमारे ४५ रंगमंचावरील कलाकार आणि ६० हून अधिक पडद्यामागचे सहकारी काम करतात.” या कलेची प्रेरणा आईकडून मिळाल्याचे सांगत त्यांनी आपल्या बालपणाच्या आठवणींनाही उजाळा दिला.रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हे त्यांचे मूळ गाव आहे.
तमाशाच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करताना खेडकर म्हणाले, “आजही तमाशा चालतो, पण मातीत बसून पाच तास कार्यक्रम पाहण्याची लोकांची मानसिकता राहिलेली नाही. खुर्च्यांची सोय केली, तर प्रेक्षकसंख्या वाढते. वेळेची मर्यादा असली तरी तमाशावरचं लोकांचं प्रेम अजूनही तितकंच आहे.”
तरुण कलावंतांना संदेश देताना ते म्हणाले, “कष्ट, संयम आणि चिकाटी ठेवली, तर पुरस्कार नक्की मिळतो. तमाशाकडे आज रोजगार म्हणून पाहायला हवं. एका दिवसाचं दीड हजारांहून अधिक मानधन मिळतं. सुशिक्षित बेरोजगार तरुणांनीही या कलेत यावं.”
शेवटी त्यांनी पुन्हा एकदा नम्रपणे सांगितले, “हा पुरस्कार मला नाही, माझ्या तमाशा सृष्टीला मिळाला आहे. खरंच, माझ्या सात पिढ्यांचा उद्धार झाला आहे.”