पोलीस ठाणे जवळ, तरी अवैध धंदे खुलेआम! उत्तर-दक्षिण चाकणमध्ये नेमकं चाललंय तरी काय?
सह्याद्री लाईव्ह | मे महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या भीषण विषारी गावठी दारू दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलत अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम उघडली होती. या कारवाईमुळे काही काळ अवैध धंद्यांना चाप बसला होता; मात्र अवघ्या काही महिन्यांतच चाकण उत्तर आणि दक्षिण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हेच व्यवसाय पुन्हा उघडपणे सुरू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
* विविध भागात अवैध व्यवसायांचे जाळे -
* बेकायदा मद्यविक्री- औद्योगिक क्षेत्र तसेच महामार्गालगतचे ढाबे, हॉटेल्स आणि आडवळणाच्या ठिकाणी देशी-विदेशी मद्याची बिनदिक्कत विक्री सुरू आहे. रात्रीच्या वेळी या प्रकारांमध्ये मोठी वाढ होत असल्याच्या तक्रारी आहेत.
* नियमबाह्य लॉजिंग व असुरक्षितता - परिसरातील काही लॉजमध्ये संशयास्पद आणि नियमबाह्य प्रकार सुरू असून, तेथे येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींमुळे स्थानिक नागरिक, विशेषतः महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
* गुटखा तस्करी व बेकायदा गॅस रिफिलिंग - राज्यात बंदी असतानाही गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची गुपचूप विक्री सुरू आहे. तसेच दाट लोकवस्तीच्या आणि मोकळ्या जागांवर होणाऱ्या बेकायदा एलपीजी गॅस रिफिलिंगमुळे मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
* नागरिकांचे प्रश्न आणि कडक कारवाईची मागणी - पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाया होत असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.कारवाईनंतर काही दिवसांतच हे धंदे पूर्ववत कसे सुरू होतात, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.
परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि संभाव्य दुर्घटनेला आळा घालण्यासाठी चाकण उत्तर व दक्षिण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पुन्हा एकदा ठोस आणि व्यापक धडक मोहीम राबवावी, अशी तीव्र मागणी चाकणच्या नागरिकांमधून केली जात आहे.