“माझे वृक्ष, माझी जबाबदारी” अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद;दोन हजार झाडांचे मोफत वाटप

चाकण नगरपरिषदेचा उपक्रम

 0
“माझे वृक्ष, माझी जबाबदारी” अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद;दोन हजार झाडांचे मोफत वाटप

चाकण (पुणे) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चाकण नगर परिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या “माझे वृक्ष, माझी जबाबदारी” या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नगर परिषद आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने तब्बल २ हजार झाडांचे मोफत वाटप करण्यात आले.

चाकण नगरपरिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. तसेच मराठी हायस्कूलच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमास नगराध्यक्षा मनीषा गोरे,उपनगराध्यक्षा सुवर्णा राक्षे,मुख्याधिकारी डॉ.अंकुश जाधव,नगरसेवक,अधिकारी,कर्मचारी,वनविभागाचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.

नागरिकांना मोफत रोपांसह कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. प्लास्टिकमुक्त चाकण घडविण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला. वनविभाग चाकण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य तसेच चाकण नगर परिषदेचे शिवसेना गटनेते नितीन गोरे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी बोलताना नितीन गोरे म्हणाले की, “वृक्षारोपण हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नसून भावी पिढ्यांसाठी सुरक्षित आणि समृद्ध पर्यावरण निर्माण करण्याची चळवळ आहे. आपण लावलेले प्रत्येक झाड हे आपल्या मुलांच्या भविष्यातील गुंतवणूक आहे. ‘माझे वृक्ष, माझी जबाबदारी’ ही भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजली पाहिजे. तसेच ‘एक झाड आईसाठी’ या उपक्रमातून प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा.”

अभियानांतर्गत नगर परिषदेच्या प्रत्येक प्रभागात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ज्या प्रभागात लावलेल्या झाडांचे संगोपन सर्वाधिक होईल आणि झाडे जिवंत राहण्याचे प्रमाण जास्त असेल, त्या प्रभागाला पुढील वर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष सन्मान व पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.