भामा आसखेड धरणातून मोठा विसर्ग सुरू;धामणे पूल पाण्याखाली;नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
चाकण (पुणे) : परतीच्या पावसाने मागील दोन दिवसांपासून खेड तालुक्यातील भामा आसखेड परिसरात जोरदार हजेरी लावल्याने भामा आसखेड धरणातून मोठा विसर्ग सुरू करण्यात आल्याने धामणे येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.यामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, मुंबई–तळेगाव या ठिकाणी जाणारे प्रवासी व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
जोरदार पाऊस आणि धरणातील पाण्याचा विसर्ग यामुळे धामणे पुलावरून पाणी ओसंडून वाहत असून वाहनचालक व पादचारी यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.प्रशासनाने अद्याप या ठिकाणी पर्यायी रस्त्याची व्यवस्था केली नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, दररोज नोकरीसाठी बाहेर जाणारे कामगार वेळेत कंपन्यांमध्ये पोहोचू शकत नाहीत. विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत असून अनेक ठिकाणी शाळा-कॉलेज गाठणे कठीण झाले आहे.
पुलावरून पाणी वाहणे हा प्रश्न दरवर्षी निर्माण होतो, तरीसुद्धा प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. “आमचा बाहेरील गावांशी संपर्क पूर्णपणे तुटतो, अशा वेळी तात्पुरत्या मार्गाची व्यवस्था करणे किंवा पुलाची उंची वाढवणे आवश्यक आहे,” अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
संपर्क तुटल्यामुळे व्यापारी वर्ग,रुग्णांना उपचारासाठी नेणे आणि आपत्कालीन सेवा यांनाही मोठा फटका बसत आहे.त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज असल्याचे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे युवक अध्यक्ष, जयसिंग दरेकर यांच्यासह सर्व स्तरातून प्रतिपादन होत आहे.