खेड तालुक्यात डीपी चोरी रोखण्यासाठी पुढाकार; माहिती देणाऱ्यास २१ हजारांचे बक्षीस
जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे पाटील व समर्थ फाउंडेशनची मोहीम; शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन
सामाजिक | खेड तालुक्यात शेतातील रोहित्र (डीपी) चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे. पाच ते दहा लाख रुपये किमतीच्या रोहित्रामधून चोरटे केवळ २५ ते ३० हजार रुपयांच्या कॉपर वायरच्या लालसेपोटी संपूर्ण यंत्रणा उध्वस्त करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन ऐन हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठे संकट कोसळत आहे.
या पार्श्वभूमीवर रोहित्र चोरीला आळा घालण्यासाठी बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे पाटील आणि समर्थ फाउंडेशन यांच्या वतीने विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. चोरी करणाऱ्या टोळीबाबत ठोस माहिती देणाऱ्या किंवा त्यांना पकडण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीस २१ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
फाउंडेशनच्या वतीने माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच परिसरात कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास किंवा कोणी डीपीची छेडछाड करताना दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनीही आपल्या शेतातील रोहित्रांवर लक्ष ठेवून सतर्क राहावे व संशयास्पद हालचाली दिसल्यास लगेच माहिती द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
* ठळक मुद्दे :
* खेड तालुक्यात डीपी चोरीच्या घटनांमध्ये वाढ.
* कॉपर वायरच्या लालसेपोटी लाखोंचे नुकसान.
* माहिती देणाऱ्यास २१ हजारांचे बक्षीस जाहीर.
* माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवणार.