वाघजाईनगरच्या खड्डेमय रस्त्याला प्रशासन हादरले

आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

 0
वाघजाईनगरच्या खड्डेमय रस्त्याला प्रशासन हादरले

चाकण एमआयडीसी परिसरातील वाघजाईनगर रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात खराबवाडीचे माजी उपसरपंच बाळासाहेब शिळवणे यांनी जाहीर केलेले आमरण उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. या रस्त्यावरून होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, खड्ड्यांचे साम्राज्य आणि प्रशासनाचे दुर्लक्ष याविरोधात बाळासाहेब शिळवणे ८ तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार होते. मात्र, आमदार बाबाजी काळे यांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत रस्ता दुरुस्ती व निधी वाटपाचे आश्वासन मिळाल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामासाठी निधी मंजूर न झाल्यास तीव्र आमरण उपोषण छेडण्याचा ठाम इशारा बाळासाहेब शिळवणे व ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

या पत्रकार परिषदेला शशिकांत सावळे, शंकर गुजर, दत्तात्रय रामचंद्र शिळवणे, नागेश शेलार, पांडुरंग शिळवणे, आदित्य मेने, रविराज शिळवणे, पांडुरंग बोडके, दिनेश साठे, समीर कदम, शिवाजी शिळवणे, साहेबराव रोकडे, भरत बोडके, विशाल कदम, सिद्धेश गुजर, निहार चव्हाण, मनीष शिळवणे, भूषण शिळवणे, रोहित गुजर, साई भिसे, आयुष शिळवणे, किरण शिळवणे, सुयोग शिळवणे, संदेश शिळवणे, प्रतीक चव्हाण आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चाकण-तळेगाव महामार्गाला चाकण-आंबेठाण रस्त्याशी जोडणाऱ्या वाघजाईनगर परिसरातील रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीच्या कामासाठी खोदकाम केल्यानंतर कंत्राटदाराने केलेल्या निकृष्ट कामामुळे संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे. एमआयडीसीतील अवजड वाहनांची सततची वर्दळ, शालेय बसेसची होणारी कोंडी आणि नागरिकांचे होणारे हाल यावर तोडगा निघत नसल्याने माजी उपसरपंच बाळासाहेब शिळवणे यांनी ग्रामस्थांच्या पाठिंब्याने ८ तारखेपासून थेट आमरण उपोषण पुकारले होते.

या इशाऱ्यानंतर आमदार बाबाजी काळे यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टमंडळाची बैठक घडवून आणली. या बैठकीत एमआयडीसीतील रस्त्यांच्या यादीत वाघजाईनगर रस्त्याचा समावेश करून निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासकीय पातळीवर नोंद घेण्यात आली.

प्रशासनाच्या या आश्वासनामुळे बाळासाहेब शिळवणे यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, केवळ केमिकल पॅचवर्क किंवा तात्पुरती मलमपट्टी न करता पूर्णपणे दर्जेदार व मजबूत रस्ता तयार व्हावा, अन्यथा दोन ते तीन महिन्यांत पुन्हा आमरण उपोषण करू, असा पुनरुच्चार बाळासाहेब शिळवणे आणि शिवसेना तालुका समन्वयक संतोष शिळवणे, शशिकांत सावळे यांनी केला.

माजी उपसरपंच बाळासाहेब शिळवणे यांच्या उपोषणाच्या पवित्र्यानंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असल्या, तरी येत्या दोन-तीन महिन्यांत प्रत्यक्ष निधी पडून रस्त्याचे काम कधी मार्गी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.