आयात उमेदवारास उमेदवारी दिल्यास निष्ठावंत घेणार वेगळा निर्णय; नाणेकरवाडी - महाळुंगे जिल्हा परिषद गट

 0
आयात उमेदवारास उमेदवारी दिल्यास निष्ठावंत घेणार वेगळा निर्णय; नाणेकरवाडी - महाळुंगे जिल्हा परिषद गट

सह्याद्री DIGITAL NEWS - नाणेकरवाडी - महाळुंगे जिल्हा परिषद गटातून पक्षाशी एकनिष्ठ असलेले उमेदवारांना बाजूला ठेवून आयात उमेदवारास संधी देण्याच्या हालचालीने प्रबळ इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. यामुळे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. निष्ठावंताला संधी मिळणार की आयात उमेदवाराला ऐनवेळी तिकीट मिळणार या चर्चेने या गटातील नागरिकांमध्ये चर्चेची गुऱ्हाळे सुरु झाली आहेत.

  नाणेकरवाडी - महाळुंगे हा जिल्हा परिषदेचा गट एकूण ११ गावांचा असून त्यामध्ये एमआयडीसी क्षेत्रातील गावांचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असल्यामुळे "मुह मांगो दाम, और करो काम" यामुळे हा गट हायव्होल्टेज समजला जातो. या गटातून निवडणूकिसाठी अनेक दिग्गज आपल्या पक्षाकडून इच्छुक आहेत. उमेदवारी निष्ठावंत कार्यकर्त्यांना मिळणार का ? हाच खरा प्रश्न या गटात निर्माण झाला आहे. पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांला तिकीट मिळाले तर दुफळी होणार नाही मात्र दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्याला तिकीट दिले तर आयात उमेदवार म्हणून निष्ठावंत कार्यकर्ते काम करणार का आणि हा खटाटोप कशासाठी हाही प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेला जाऊ लागला आहे.

 नाणेकवाडी महाळुंगे या गटातून खराबवाडी गावचे व भाजपाचे कार्यकर्ते असूनही पक्षाची भूमिका बाजूला ठेवून विद्यमान आमदार यांना २०२४ च्या विधानसभेला मदत केलेले संदीप सोमवंशी आणि शिवसेनेचे नेते, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार,नाणेकरवाडी गावचे माजी उपसरपंच गणेश नाणेकर हे शिवसेना पक्षाकडून सर्वपक्षीय उमेदवार म्हणून इच्छुक आहेत.

पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार इच्छुक असून त्यांनी प्रचारांमध्ये मोठ्या आघाडी घेतलेली आहे.युवा नेते संदीप सोमवंशी,गणेश नाणेकर यांनी देखील पायाला भिंगरी बांधल्यासारखे संपूर्ण गट पिंजून काढला आहे. एकंदरीत पवार, सोमवंशी व नाणेकर यांनाच तिकीट मिळावे अशीच कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

एकनिष्ठ असल्याने पक्षाकडून यांनाच तिकीट मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मात्र इथे निष्ठावंत सोडून तिकीट देताना काही गडबड झाली तर पक्षाला किंमत मोजावी लागेल हे तितकेच सत्य आहे.लोकप्रतिनिधी या गटात तिकीट देण्यावरून संभ्रम अवस्थेत असल्याचे समजते. राष्ट्रवादी पक्षाकडून गणेश बोत्रे इच्छुक असून त्यांनी तर गटातील गावागावात प्रचाराचे मैदान गाजविले आहे.

वरील इच्छुक उमेदवारांना बाजूला सारून खराबवाडी गावातील एक उद्योजक शिवसेना पक्षाकडून प्रबळ इच्छुक आहेत.त्यांच्या उमेदवारीवरून पक्षात धुसफूस असल्याचे बोलले जात आहे.आर्थिकदृष्ट्या सक्षम हा नियम लावून जर आयात उमेदवाराला तिकीट बहाल केले तर उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यांनी निष्ठेला तिलांजली दिली त्या नेत्याला पक्षांत प्रवेश देऊन त्यांना ऐनवेळी उमेदवारी देण्याच्या हालचाली होतं असल्याचे दिसत आहे.पण आयात नेते कितपत सफल होतात असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

* नुकताच या इच्छुक उमेदवाराकडून कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी तालुक्याचे लोकप्रतिनिधींचे नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांना पाठवल्याने गटातील निष्ठावंत कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून याची दक्षता देखील त्यांनी घेण्याची गरज आहे. भविष्यात या गटाचे राजकारण आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शुक्ष्म निरीक्षण करून योग्य व निष्ठावंत उमेदवारांची पारख करून तिकीट देणे हेच योग्य ठरणार आहे.