येलवाडीत तरुणाकडून गावठी कट्टा आणि काडतुसे जप्त; महाळुंगे MIDC पोलिसांची कारवाई
सह्याद्री DIGITAL NEWS - खेड तालुक्यातील येलवाडी परिसरात महाळुंगे एमआयडीसीमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका तरुणाला गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली आहे.पोलीस आयुक्तालयाच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून अवैध शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
स्वराज कालापाड (वय २५ वर्षे, रा. वराळे, खेड) हा संशयास्पद स्थितीत फिरताना दिसला. त्याची झडती घेतली असता देशी बनावटीचा पिस्तूल (गावठी कट्टा) आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली.
सदर शस्त्रासाठी कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. तसेच पोलिस आयुक्तालयाने जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून आरोपीने अवैध शस्त्र जवळ बाळगल्याचेही समोर आले.
जप्त करण्यात आलेल्या शस्त्र आणि काडतुसांची अंदाजे किंमत ४१,५०० रुपये इतकी असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्यावर संबंधित गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
महाळुंगे एमआयडीसी परिसरात अवैध शस्त्रधारकांविरुद्ध सातत्याने कारवाया सुरू असून, ही अलीकडील आणखी एक कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.