चाकण शहरातील P1-P2 टोईंग व्हॅनला अखेर कायमचा रामराम;चाकणकरांच्या रेट्याला यश
सामाजिक | चाकण शहरात मागील काही दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या सम-विषम दुचाकी पार्किंग नियमांतर्गत टोईंग व्हॅनच्या कारवाईला अखेर कायमस्वरूपी स्थगिती देण्यात आली आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच विविध राजकीय पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या तीव्र विरोधानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून चाकणकरांच्या रेट्याला यश आल्याची भावना व्यक्त होत आहे.
शहरातील P1-P2 पार्किंग व्यवस्थेअंतर्गत दुचाकींवर करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाईबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. टोईंग व्हॅनची कारवाई करताना संवादाचा अभाव, पर्यायी पार्किंग व्यवस्थेची कमतरता आणि नागरिकांना होणारा मनस्ताप यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. अनेक वाहनधारक आणि व्यापाऱ्यांनी या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला होता.
दरम्यान,टोईंग व्हॅनची कारवाई थांबविण्याबाबत चाकणचे नगरसेवक नितीन गोरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास हा विषय आणून दिला. शहरातील परिस्थितीची सविस्तर माहिती देत नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप करत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानुसार P1-P2 परिसरातील टोईंग व्हॅन कारवाईला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे चाकण शहरातील नागरिक, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांच्या भावना आणि लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
शहरातील वाहतूक शिस्त कायम राखण्यासाठी पर्यायी उपाययोजना, नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था आणि प्रशासन-नागरिक समन्वयातून पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सर्व नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन गोरे यांच्याकडून करण्यात आले आहे.