पावसाळा तोंडावर; चाकण शहरातील नाले सफाईकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष

 0
पावसाळा तोंडावर; चाकण शहरातील नाले सफाईकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष

सामाजिक | पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही चाकण नगरपरिषदेच्या वतीने शहरातील नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये प्लॅस्टिक कचरा, साचलेला गाळ आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका वाढला असून नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

चाकण औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत असल्याने शहरासह परिसरातील नागरी वस्त्यांमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हजारो कामगार आणि नागरिक वास्तव्यास आल्यामुळे सांडपाणी व कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत शहरातील नाले व्यवस्था सक्षम करण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही.

शहरातील अनेक भागांमध्ये उघडे नाले असून त्यामध्ये प्लास्टिक पिशव्या, कचरा आणि सांडपाणी साचलेले दिसून येत आहे. नियमित नाले सफाई होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून डासांचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात हीच परिस्थिती कायम राहिल्यास डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढू शकतो, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शहरातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरज लक्षात घेता प्रमुख भागांमध्ये बंदिस्त नाले उभारण्याची आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी तातडीने सर्व नाल्यांची सफाई करून साचलेला कचरा हटविण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

स्थानिक नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाने केवळ कागदोपत्री काम न करता प्रत्यक्षात शहरातील स्वच्छता आणि नाले व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. अन्यथा आगामी पावसाळ्यात नागरिकांना पाणी तुंबणे, दुर्गंधी आणि रोगराईचा मोठा सामना करावा लागू शकतो, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.