“श्रीक्षेत्र भंडारा डोंगर हे वारकरी संप्रदायातील प्रेरणादायी शक्ती स्थळ आहे,”- अतुल लिमये
अध्यात्मिक | श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ही साधना,चिंतन आणि अध्यात्माची पवित्र भूमी आहे. अखिल विश्वाच्या कल्याणासाठी भक्तीचा मार्ग दाखविणारी, पंचम वेद मानली जाणारी गाथा विश्ववंदनीय जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी याच पावन भूमीत रचली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील तुकोबारायांच्या कार्यातून स्फूर्ती घेतली, येणाऱ्या प्रत्येक भाविकास आजही तुकोबारायांच्या कार्याची प्रेरणा व आशीर्वाद जाणवतो. आगामी काळात हे स्थळ वारकरी संप्रदायातील एक महत्त्वपूर्ण प्रेरणास्थान म्हणून उदयास येईल, असा विश्वास अतुल लिमये यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे भेट देऊन संत तुकोबारायांचे दर्शन घेतले व सुरू असलेल्या भव्य-दिव्य मंदिर उभारणीच्या कार्याची पाहणी केली. ट्रस्टच्या वतीने टाळ-मृदंगाच्या गजरात पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल-रुखमाई व संत तुकाराम महाराजांची आरती करण्यात आली.
ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पगडी व वीणा देऊन अतुल लिमये यांचा सत्कार करण्यात आला. अयोध्या नगरीतील प्रभू श्रीराम मंदिराचे शिल्पकारच या मंदिर उभारणीचे कार्य करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
संवाद साधताना त्यांनी सांगितले की, संत आणि महापुरुषांच्या साधना व पराक्रमातून समाजात अनेक दीपस्तंभ उभे राहिले आहेत. संत तुकाराम महाराजांच्या या पुण्यभूमीत “पंचम वेद” निर्माण झाला आहे. देव,देश,धर्म आणि मानवतेच्या कल्याणासाठी संतांनी आयुष्य अर्पण केले. त्याच विचारांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली शंभर वर्षे समाजसंघटन, राष्ट्रपुनरुत्थान आणि मानवकल्याणासाठी कार्यरत आहे.
या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र धर्माचार्य संपर्क प्रमुख व श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाई देवस्थानचे विश्वस्त हभप शिवाजी महाराज मोरे,प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायकराव थोरात,पुणे विभाग सहकार्यवाह अविनाश भेगडे,प्रचारक मंगेश बडवे,जिल्हा कार्यवाह हेमंत दाभाडे,नरेंद्र पेंडसे, सोमनाथ बोडके,सचिन ढोबळे,शिल्पकार चेतन हिंगे,शिवराज हगवणे तसेच ट्रस्टचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी,सदस्य व भाविक उपस्थित होते.
मंदिर उभारणीच्या कार्याची सविस्तर माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी दिली, तर हभप रवींद्र महाराज ढोरे यांनी आभार प्रदर्शन केले.