अवैध वेश्याव्यवसायावर पोलिसांची छापेमारी;चाकण परिसरात पोलिसांची कारवाई
सह्याद्री DIGITAL NEWS - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत हॉटेल, मसाज पार्लर आणि स्पा यांच्या आडून सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसाया विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे वरिष्ठांच्या निर्देशानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मागील काही दिवसांत सलग धडक छापे टाकून अनेक महिलांची सुटका केली असून, अवैध धंदे चालविणाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
चाकणमध्ये लॉजवर छापा –
पाच महिलांची सुटका (दि. २१ नोव्हेंबर ) रोजी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी फाटा ( PCMC Police Raids) परिसरातील ‘सप्तगिरी लॉज’ येथे पथकाने छापा टाकून पाच महिलांची सुटका केली. या प्रकरणात लॉज चालकाला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हिंजवडी व रावेतमध्येही छापे –
हिंजवडीतील ‘सनराईज वेलनेस आयुर्वेदिक स्पा’ आणि रावेतमधील ‘निसर्गम आयुर्वेदिक स्पा’ येथे कारवाई करत पथकाने एकूण तीन महिलांची सुटका केली होती. दोन्ही स्पा चालक व संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत.
चालू वर्षात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने विविध ठिकाणी एकूण २६ कारवाया केल्या आहेत. यात ६ मसाज पार्लर/स्पा, ७ हॉटेल, ३ रहिवाशी फ्लॅट आणि १० ऑनलाइन पद्धतीने चालणाऱ्या वेश्याव्यवसायाच्या प्रकरणांचा समावेश आहे. या सर्व कारवायांतून ५५ महिलांची सुटका झाली असून ४२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक रस्त्यावर उभे राहून अश्लील हातवारे करणाऱ्या महिलांवरही कारवाई करत ९७ महिलांवर ६५ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. पोलीस पथकाकडून ही मोहीम पुढे अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
चार आस्थापना एक वर्षासाठी बंद -
मागील एका महिन्यात सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात स्पा व रहिवाशी जागेच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या चार आस्थापनांवर एक वर्षासाठी बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. यात वाकडमधील ‘रुपेन स्पा’ आणि रहिवाशी फ्लॅट, हिंजवडीतील ‘द वेदा स्पा’ आणि सांगवीतील ‘न्यू ओम स्पा’ यांचा समावेश आहे. आयुक्तालयाने अशा संशयित इतर आस्थापनांचीही प्राथमिक चौकशी सुरू केली असून लवकरच आणखी कठोर निर्णय घेतले जाणार आहेत.