पहेलगाम घटनेच्या निषेधार्थ चाकणला मुस्लिम समाजाची मूक पदयात्रा; आतंकवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी

चाकण ( पुणे ) : जम्मू - काश्मीरच्या पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ चाकण (ता.खेड) शहरातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने शहरात मूक पदयात्रा काढून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
या मूक पदयात्रेत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष जमीरभाई काझी,अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष मोबीनभाई काझी,हसनभाई मुंडे,नजीरभाई काझी,दत्तात्रय चौधरी,सरफुद्दीन अन्सारी,युनूस अन्सारी,अजमुद्दिन मुल्ला,दिलावर आतार,आयाज आतार,असिफ तांबोळी आदींसह शेकडो युवकांसह मुस्लिम समाज बांधवानी सहभाग घेतला होता.
जम्मू काश्मीर येथील पहेलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात निरपराध लोकांचा बळी गेल्याने संपूर्ण देश हळहळला आहे.या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी मूक मोर्चे,कँडल मार्च काढण्यात येत आहे.चाकण येथे ही मुस्लिम समाजाच्या वतीने खंडोबा माळ ते पोलीस ठाणे असा मूक मोर्चा काढण्यात आला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आले आहे.
आतंकवादी हल्ला करणे,या कृत्याला इस्लाम धर्मात अजिबात थारा नाही.निष्पाप लोकांना जीवे ठार मारणे,हे धर्माला मान्य नाही.या भ्याड हल्ल्यातील सूत्रधारांसह आतंकवाद्यांवर कडक शासन करण्यात यावे,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष मोबिनभाई काझी यांनी केली आहे.
" आम्ही या भयंकर कृत्याचा तीव्र निषेध करतो. आम्हाला फक्त एवढेच सांगायचे आहे की दहशतवादाला विशिष्ट धर्म नसतो आणि आम्ही सामान्य काश्मिरच्या शांततेसाठी उभे आहोत आणि नेहमीच शांततेसाठी उभे राहू.जे काही केले गेले आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटते आणि हे काश्मीरचे प्रतिनिधित्व करत नाही.हे आमचे प्रतिनिधित्व करत नाही.केंद्र सरकारने यावर योग्य पावले उचलून कारवाई करावी," अशी मागणी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष जमीरभाई काझी यांनी केली आहे.