रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीचालकास बेदम मारहाण करत केली लूट

चाकण (पुणे ) : पुणे नाशिक महामार्गाने दुचाकीवरून आपल्या घराकडे जाणाऱ्या चालकास अनोळखी इसमाने हाताने आणि लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करून दुचाकीसह मोबाईल आणि रोख रक्कम काढून घेतल्याचा प्रकार कुरुळी गावच्या हद्दीत (दि.२०) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पंकज लक्ष्मीकांत कलशेट्टी (वय.३१ वर्षे,रा. मोशी,मुळ रा. शामनगर,जुने समाजकल्याण कार्यालय पाठीमागे,ता.जि.लातुर ) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दिपक रावसाहेब साठे (वय.२६ वर्षे,सध्या रा.संदीप मुर्हे यांचे खोलीत,मोई.मुळ रा.सालगाव ता.परतुर,जि.जालना)याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पंकज कलशेट्टी हे आपल्या ताब्यातील दुचाकीवरून पुणे नाशिक महामार्गावरील कुरुळी गावच्या हद्दीतील हॉटेल महाराजासमोरून मोशी गावाकडे रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जात असताना,आरोपी दीपक साठे याने दुचाकी अडवून पंकज याला हाताने आणि लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली.फिर्यादी यांची पंचवीस हजार रुपये किमतीची होंडा शाईन दुचाकी,दहा हजार रुपयांचा मोबाईल आणि रोख तीन हजार रुपये असा मुद्देमाल हिसकावून पळून गेला होता.पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत.