भामा आसखेड बंधाऱ्यात पोहताना सोळा वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

चाकण ( पुणे ) : भामा आसखेड धरणाच्या आसखेड बुद्रुक बंधाऱ्यातील कुंडात पोहण्यासाठी उतरलेल्या एका सोळा वर्षीय युवकाचा दम लागल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना (दि. १) सकाळी साडे दहा ते अकराच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत आदित्य नानासाहेब पिसाळ (वय १६, प्राधिकरण, आकुर्डी) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
* फिरण्यासाठी गेलेली पाच मित्रांची टोळी -
मिळालेल्या माहितीनुसार,आदित्य हा आपल्या चार मित्रांसोबत भामा आसखेड धरणावर फिरण्यासाठी गेला होता.उन्हाचा कडाका वाढल्यामुळे सहा मित्रांनी एकत्र पोहण्याचा निर्णय घेतला.भामा आसखेड धरणाच्या आसखेड बुद्रुक बंधाऱ्यातील कुंडात सर्व जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले मात्र पोहत असताना आदित्यचा श्वास कमी पडू लागला आणि तो हळूहळू पाण्यात बुडू लागला.
* ग्रामस्थ व पोलिसांचा त्वरित मदतीचा प्रयत्न -
घटनेची माहिती मिळताच आसखेड गावचे पोलीस पाटील नितीन बापू गाडे आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अथक प्रयत्न करून आदित्यला पाण्याबाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
* धरण परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर -
या घटनेमुळे धरण परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत तरुणाई धरणात पोहण्यासाठी जात असते, मात्र सुरक्षेची योग्य व्यवस्था नसल्याने असे अपघात वारंवार घडत आहेत.प्रशासनाने अशा दुर्घटनांना आळा घालण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत,अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे