महाविद्यालयीन युवतीचा खून ; राजगुरुनगर शहरासह परिसरात खळबळ

राजगुरूनगर ( पुणे ) : मांजरेवाडी (धर्म) (ता.खेड ) येथे महाविद्यालयीन तरुणीचा खून करून तिचा मृतदेह भीमा नदीपात्रालगत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अपेक्षा वसंत मांजरे (वय.१७ वर्षे ) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी एका संशयित व्यक्तीला खेड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेत होती. शुक्रवारी (दि. ११) राजगुरुनगर येथे नेहमीप्रमाणे सकाळी शिक्षणासाठी आली होती. दुपारी ती घरी न परतल्यामुळे घरातील सदस्यांनी हरवल्याची तक्रार खेड पोलिसांत दिली होती. शनिवारी (दि. १२) दुपारी भीमा नदीकाठी तिचा मृतदेह आढळून आला. सोबत असलेली शाळेची बॅग बाजूच्या विहिरीत आढळून आली. तर पीडित तरुणीच्या डोक्यावर, चेहऱ्यावर गंभीर जखमा आढळून आल्या. या घटनेबाबत गावातील नवनाथ कैलास मांजरे या संशयित तरुणाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे सांगितले.
दरम्यान, रविवारी (दि. १३) मृत मुलीच्या मोठ्या बहिणीचा साक्षी गंधाचा कार्यक्रम गावातच होणार होता. त्यामुळे सर्व कुटुंब आनंदात होते.मात्र, छोट्या मुलीचा खून झाल्यामुळे कुटुंबासह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ही घटना मांजरेवाडी गावच्या शांत परिसरात घडल्याने खून झालेली युवती ही शिक्षण घेणारी महाविद्यालयीन विद्यार्थिनी असल्याने या प्रकरणाने समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे.यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास कसा पुढे जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील तपासात काय उघड होणार? पोलिसांचा तपास आता वेगाने पुढे सरकत आहे. संशयित तरुणाची चौकशी, शवविच्छेदन अहवाल आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.