नाहीतर आम्हाला एमआयडीसी विरोधात मोठे आंदोलन उभे करावे लागेल - शरद बुट्टेपाटील

 0
नाहीतर आम्हाला एमआयडीसी विरोधात मोठे आंदोलन उभे करावे लागेल - शरद बुट्टेपाटील

चाकण (पुणे) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या चाकण टप्पा क्रमांक दोनमध्ये मोठ्या संख्येने कारखानदारी वाढली आहे.यामुळे प्रजिमा २० चाकण ते भांबोली - वासुली फाटा या रस्त्यावर प्रचंड वहातुक कोंडी होत आहे.ही वाहतूक कोंडी दहा दिवसांत कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी दिला आहे.

वाहतूक कोंडीबाबत शुक्रवार (दि.२८)ला चिंचवड विभाग प्रकल्प कार्यकारी अभियंता प्रकाश भडंगे यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टेपाटील,खेड तालुका ग्रामीण भाजपचे मंडल अध्यक्ष सुनील देवकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष काळूराम पिंजण,माजी आदर्श सरपंच दत्तात्रय मांडेकर,शरद निखाडे,रोहित डावरे,कोरेगावचे सरपंच प्रवीण लगाडे,आनंदा निखाडे,भाऊसाहेब लांडगे आदी उपस्थित होते.

चाकण - वासुली फाटा प्रजिमा २० या रस्त्याचा उपयोग या कार्यक्षेत्र व पश्चिम पट्टयातील ३० हून अधिक गावे करतात.या गावातून चाकणला शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी शाळेला,परिक्षेला, क्लासला वेळेत पोहचत नसल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे.चाकण बाजार मार्केट यार्डला शेतकरी तरकारी भाजीपाला वेळेत नेवू शकत नसल्याने त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

चाकण ते वासुली या फाटा या १० किलोमीटर अंतरासाठी २ तासापेक्षा अधिक वेळ प्रवास करावा लागत असल्याने नागरिक वैतागलेले आहेत.तसेच शासकीय कर्मचारी या गावात वेळेत पोहचत नाहीत.या मार्गावर कंटेनर,ट्रेलर आदी जड वाहनांमुळे हलक्या आणि दुचाकी वाहनांना रस्ता शिल्लक राहत नसल्याने झालेल्या जीवघेण्या अपघातात निरपराध मुलांचा मृत्यू झाला आहे.

 महामंडळाने तातडीने ७५ मीटर रस्ता कॉर्निग वराळे ते पुढे पुणे - नाशिक महामार्गपर्यंत संथगतीने सुरू असलेले काम युध्दपातळीवर करावे,प्रजिमा २० रस्त्यावरील अवजड वाहतूक सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळात बंद करावी.

बिरदवडी,दवणेमळा,आंबेठाण गाव,कोरेगाव फाटा,भांबोली फाटा येथे कायमस्वरूपी वाहतूक नियमन करण्यासाठी वाहतूक पोलीस कर्मचारी किंवा महामंडळाने कर्मचारी नेमावेत.अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या उपाययोजना पुढील दहा दिवसात न झाल्यास तीव्र आंदोलन उभे करावे लागेल.असा इशारा देण्यात आला आहे.