कामगारांना खोलीत डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस;आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 0
कामगारांना खोलीत डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस;आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आळंदी ( पुणे ) : टरबूज गाडी भरायची आहे असे सांगून चार कामगारांना शेतातील खोलीत डांबून ठेवून लाकडी दांडक्याने मारहाण करत बळजबरीने शेतातील कामे करून घेतल्याप्रकरणी तीन जणांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  मोहन मारुती वगरे (वय.३० वर्षे,धंदा मिस्त्री रा. विश्रातवाडी रोड,ठाकरवस्ती,आळंदी ता.खेड,जि.पुणे ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १) नितीन भाऊसाहेब निंबाळकर (वय.३८ वर्षे), २) गणेश भाऊसाहेब निंबाळकर (वय.३५वर्षे) या दोन सख्ख्या भावांसह वडील भाऊसाहेब निंबाळकर वय.५० वर्षे,सर्व रा.कर्जत,ता.दुरगांव,जि.अहिल्यानगर ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी मोहन मारुती वगरे हे देवानंद सुभाष लांबटोगळे(रा.ब्रम्हणगाव,जि.यवतमाळ),पप्पू गणेशराव मगर (रा.शिणगी,ता.कळंदरी,जि. हिंगोली),मुकुलकुमार डिसूझा,रा.गोरखपुर,उत्तर प्रदेश आणि श्रीराम बेदरे (रा.परभणी ) या पाच जणांना निंबाळकर पिता पुत्रांनी टरबुज गाडी लोड करायची आहे असे खोटे सांगून,चारचाकी वाहन स्वीफ्ट गाडी क्र.(एमएच १४ एफएस ४९४०) मध्ये बसवून लोणीकंद,केसनंद मार्गे सोलापूर, पंढरपूर मार्गाने कर्जत तालुका दुरगांव येथील शेतात नेले.( दि.१४/०३/२०२५ ते दि.२५/०३/२०२५) दरम्यानच्या काळात शेतातील खोलीत बळजबरीने डांबून ठेवून सर्वांकडून जबरदस्तीने काम करून घेतले,त्या बदल्यात कोणताही मोबदला न देता फिर्यादी आणि पप्पू मगर यांना लाथाबुक्यांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण करत शिवीगाळ,दमदाटी केली.पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.