जिल्हाधिकारी यांची परीक्षा केंद्राला अचानक भेट परीक्षामधील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

 0
जिल्हाधिकारी यांची परीक्षा केंद्राला अचानक भेट परीक्षामधील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

रायगड : जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष किशन जावळे यांनी अलिबाग शहरातील बारावीच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.

 जिल्ह्यातील परीक्षांचे संचलन सुयोग्य व परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची स्थापन करण्यात आली आहे.राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षामधील गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाची देखील प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.जिल्ह्यात परीक्षा काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आले आहे. 

इंग्लिश विषयाची परीक्षा सुरू असताना जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी जनरल अरुण कुमार वैद्य महाविद्यालय येथील केंद्राला अचानक भेट दिली. त्यांनी तेथील सुरक्षा व्यवस्थेची व परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.

परीक्षेतील गैरप्रकारांना सहकार्य करणाऱ्यांविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देश जावळे यांनी केंद्र प्रमुखांना यावेळी दिले.कॉपीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा येत असल्याने असे प्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यावर्षी कठोर उपाय केले आहेत. येत्या काळात प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अचानकपणे जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांना भेट देणार असून तेथे गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचेही जावळे यांनी सांगितले.

बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण ५० परीक्षा केंद्र असून ३१ हजार ८५७ विद्यार्थी बसले आहेत.

( याकूब सय्यद _रायगड जिल्हा प्रतिनिधी )