पठारवाडीत बॅग हरवली,माणूसकी सापडली ! विद्यार्थ्यांना रस्त्यावर सापडलेली पैशांची बॅग केली परत

 0
पठारवाडीत बॅग हरवली,माणूसकी सापडली ! विद्यार्थ्यांना रस्त्यावर सापडलेली पैशांची बॅग केली परत

चाकण ( पुणे ) : सध्याच्या काळात लोकांमध्ये प्रामाणिकपणा आणि माणूसकी राहिली नाही असे सहज बोलले जाते.मात्र चाकणलगतच्या पठारवाडी (ता. खेड ) येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी प्रामाणिकपणा टिकून असल्याचे येथील आदिवासी कातकरी मुलांनी दाखवून दिले.

साहील भोईर,विकास जाधव,सागर मुकणे, ओंकार हिलम,सोहम मुकणे हे आदिवासी कातकरी समाजातील विद्यार्थी सकाळी शाळेत येत होते.यावेळी त्यांना रस्त्यावर पडलेली बॅग दिसली.त्यांनी ती बॅग शाळेतील शिक्षिका माधुरी लोधी यांच्याकडे आणून दिली.त्यामध्ये दहा हजार रुपये,बांधकामाचे अग्रीमेंट,पासबुक चेकबुक, एटीएम कार्ड,पॅन कार्ड व आधारकार्ड अशी अनेक कागदपत्रे होती.अग्रीमेंटवरुन शिक्षकांनी शिब्बू अली यांच्या मदतीने विकास देशमुख यांचेशी संपर्क केला.त्यांनी अर्जुन पोखरकर यांची बॅग असल्याची खात्री पटवली आणि अर्जुन पोखरकर यांना बोलावून सर्व कागद‌पत्र व रकमेसह बॅग परत केली.या मुलांचा प्रामाणिकपणा पाहून पोखरकर यांनी त्यांना पाचशे रुपयांचे बक्षीस दिले व त्यांचे कौतूक केले.

 यावेळी मुख्याध्यापक मनोहर मोहरे म्हणाले,हे विद्यार्थी अत्यंत गरीब घरचे झोपडीत राहणारे आहेत.त्यांना वेळेवर पोटभर जेवणही मिळत नाही.नविन कपडे,शुज,सॉक्स,दप्तरे,पाटी पेन्सीलही त्यांच्याजवळ नसते.परीस्थितीने गरीब असले तरी मनाने श्रीमंत असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवले.शाळेमध्ये व्याख्याने, संस्कारवर्ग,संस्कारकथा,लेखक भेटीला,वस्तू हरवली,माणुसकी सापडली असे विविध उपक्रम राबविल्याने मुले संस्कारक्षम घडली आहेत,याचा अभिमान वाटतो.

 वस्तु हरवली माणुसकी सापडली या उपक्रमामुळे कोणाचीही वस्तू सापडल्यास मुले प्रामाणिकपणे शाळेत आणून देतात.सापडलेली बॅग मुलांनी प्रामाणिकपणे आणून दिली हे त्याचेच फलित आहे असे मुख्याध्यापक मनोहर मोहरे म्हणाले.

नुकतेच लेखक आपल्या भेटीला या उपक्रमात लेखिका डॉ.रोहीणी गव्हाणे,प्रगतशील शेतकरी पांडुरंग पठारे,नाट्यकलाकार विजयकुमार तांबे, ललिता पठारे यांच्या शुभहस्ते या मुलांना बक्षीस देण्यात आले वाटप.या विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वच स्थरांतून त्यांचे कौतुक होत आहे.